वंजारवाडी पुलाची खड्ड्यांमुळे चाळण

रस्त्याबद्दल स्थानिक आक्रमक
| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील पेज नदीवरील वंजारवाडी येथील पूल अंतिम धापा टाकत आहे. त्या पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे असलेला रस्ता तसेच पुलाची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली नाही. त्यात आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून देखील रस्त्याच्या तसेच पुलाबाबत सकारात्मक विचार केला जात नाही आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचंड रोष रस्ते विकास महामंडळ यांच्याबद्दल सुरु आहे. दरम्यान, पावसात नाल्यासारखे पाणी रस्त्यावरून वाहत असून, रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून दुरुस्ती झाली नाहीतर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भागुची वाडी ते मार्केवाडी येथील रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने पेज नदी ते वंजारवाडी येथील चांगल्या अवस्थेतील रस्ता रस्ता तीन वर्षांपूर्वी खोदून ठेवला आहे. रत्याच्या या भागात नक्की काय करायचे याचे नियोजन नसताना रस्ता खोदल्याने वाहन चालकांना खूप त्रास होत आहे. येथील खड्डे चुकवताना दुचाकी स्वराचा अपघात होण्याची शक्यता आहे. पेज नदीच्या पुलावरदेखील खूप मोठे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यात अवजड वाहने जोरात आपटल्याने पूल कमकुवत होत आहे. यामुळे कदाचित पूल कोसळून तीन वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीच्या पुलामुळे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती या भागातील कार्यकर्ते उदय पाटील, भास्कर देसले, मंगेश खेडेकर, भरत शीद, मोहन सकपाळ, संदेश सावंत, रुपेश हरपुडे यांनी व्यक्त केली आहे.

अन्यथा रास्ता रोका
स्थानिकांनी रस्त्यावरून वाहत जाणार्‍या पाण्याबद्दल आणि पुलाचे आयुष्यमान लक्षात घेऊन तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे कार्यकारी अभियंता एम.एन. कांबळे यांच्याकडे मागणी केली आहे. मुरबाड रस्त्यावरील सावळे फाटा, पेजनदी पूल ते वंजारवाडी फाटा या भागातील रस्त्यावरील खड्डे पावसाळी डांबर टाकून बुजवण्याची मागणी केली असून, त्यासाठी 30 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या भागातील तब्बल 50 गावांतील लोक आणि वाहनचालक हे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version