आठ अग्निशमन दलांची झुंज
अलिबाग शहराचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख निर्माण झालेल्या पीएनपी नाटयगृहाला बुधवारी सांयकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी संपूर्ण नाटयगृह या आगीत भस्मसात झाले आहे. आठ आठ अग्निशमन बंब घटनास्थळी हजर होत या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल तीन ते चार तास झुंजत होते. अखेर सायंकाळी साडेसात वाजता या आगीवर नियंत्रण मिळवता आले. यामुळे कोटयवधींचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुदैवाने कोणताही कार्यक्रम नसल्याने जीवीतहानी टळली.
अलिबाग शहराच्या वेशीवरच असलेल्या या नाटयगृहात सायंकाळी 4 नंतर अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. धुराचे आणि ज्वाळांचे लोड गगनाला भिडले. अलिबाग नगरपालिका, आरसीएफ, जेएसडब्ल्यू, गेल तसेच पेण नगरपालिका, पनवेल मनपा, रिलायन्स यांचे अग्नशिमन बंब आग विझवण्याचे प्रयत्न करीत होते. त्यासाठी फोमचा मारा देखील करण्यात येत होता. तब्बल दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र साऊंड प्रुफ यंत्रणा आणि आसन व्यवस्थेत असलेल्या फोममुळे आग धुमसतच होती. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच होते.
या आगीत नाटयगृहाचे पूर्ण नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर थोडयाच वेळात इमारतीचे छत कोसळून पडले, भिंतीदेखील ढासळल्या. तेथील आसन व्यवस्था, साऊंड सिस्टीम, सर्व लाकडी फर्निचर, सर्व तांत्रिक व्यवस्था जळून खाक झाले. आगीतील नुकसानीचा नेमका आकडा सांगता येत नसला तरी यात कोटयवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे वृत्त समजताच अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, चित्रा पाटील, गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी दयानंद गावडे, अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदीं घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेवदंडा अलिबाग बाह्यवलन रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणासाठी बंद केला होता.
7 जुलै 2017 रोजी या नाट्यगृहाचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवशी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. येत्या 7 जुलै ला नाटयगृहाचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार होता. 24 जून रोजी अभिनेते प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांच्या सारखं काहीतरी होतंय! या नाटकाचा प्रयोग रसिकमंच तर्फे आयोजित करण्यात आला होता.
जयंत पाटील घटनास्थळी
या आगीचे वृत समजताच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीची माहिती घेतली. या आगीबददल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
अलिबागकर रसिक हळहळले
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळाने 2017 मध्ये हे नाटयगृह उभारले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले. या नाटयगृहामुळे अलिबागकरांची सांस्कृतिक गरज पूर्ण झाली होती. अनेक नाटयप्रयोग, विविध सांस्कृतिक , राजकीय कार्यक्रम येथे होत होते. काही वर्षांतच अलिबागचे सांस्कृतिक वैभव अशी ओळख या नाटयगृहाने निर्माण केली होती. परंतु आजच्या आगीत नाटयगृह भस्मसात झाल्याने अलिबागकरांनी हळहळ व्यक्त केली.
पुन्हा नाटयगृह उभारु-चित्रलेखा पाटील
या आगीचे वृत्त कळताच पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळाचे अध्यक्षा चित्रलेखा पाटील या आजारी असतानाही हे वृत्त कळताच मुंबईतून तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत नाटयगृहात पोहचल्यानंतर त्यांना चित्र पाहून दुःख झाले. मात्र अशा प्रसंगात देखील आपली जिद्द दाखवून कार्यकर्त्यांना स्वतः धिर देत त्यांनी काही काळजी करुन नका आपण पुन्हा नाटयगृह उभारु असा विश्वास दिला.
आठ अग्निशमन दलांची झुंज
सदर आगीचे वृत्त कळताच अलिबाग नगरपरिषदेचे अग्निशमन दल, आरसीएफ कंपनीचे दोन बंब, जेएसडब्ल्यू, गेल तसेच पेण नगरपालिका, पनवेल मनपा, रिलायन्स यांचे अग्नशिमन बंब आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते. आरसीएफ थळचे युनिटप्रमुख कार्यकारी संचालक, मुख्य व्यवस्थापक प्रमोद देशमुख, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, अग्निशमन दलाचे भास्कर, जेएसडब्ल्यू कंपनीचे कुमार थत्ते, कुणाल तारकर, प्रकाश सोनवणे, निहार पाटील, राकेश वर्तक, विनय पिळणकर, हेमंत पाटील, मिलिंद पाटील आदी सहभागी होते. आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल 2 हजार लिटर फोमचा मारा केला.
ही आग विझविण्यासाठी अनेक अलिबागकर नागरिक नाटयगृहात अग्निशमन दलाला सहकार्य करीत होते. यात वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, महेश शिंदे, चौलकर, राकेश चौलकर, सागर पेरेकर, धर्मेश शाह आदीसंह अनेकांचा सहभाग होता.