अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून अधिसूचना
| रायगड | वार्ताहर |
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.25 मे रोजी 00:01 वाजल्यापासून ते 8 जून रोजी रात्री 24 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय धार्मिक व जातीय तणावाचे प्रसंग, तसेच आगामी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती (31 मे), रवी रावसाहेब देशमुख, उमापूर, ता. गेवराई, जि. बीड हे किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला झेड प्लस दर्जाची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने द्यावी तसेच इतर विविध मागण्यांकरिता किल्ले रायगडच्या पायथ्याशी बेमुदत धरणे आंदोलन (31 मे) आणि छत्रपती शिवाजी महाराज 352 वा राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम (6 जून) यामुळेदेखील अस्थिरता उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
जमावबंदीदरम्यान खालील गोष्टींवर बंदी असेल : शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी इ. वस्तू बाळगणे, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरणे, दगडफेक किंवा क्षेपणास्त्रे बाळगणे व तयार करणे, प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविणे, धोकादायक भाषण, हावभाव, चित्रप्रदर्शन पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव परवानगीशिवाय जमविणे.
सूट कोणाला?
या अधिसूचनेतून शासकीय अधिकारी, शासकीय कर्तव्यावरील कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव, आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत. तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यासच कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार असून, त्याची जबाबदारी आयोजकांची असेल. पोलीस व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.