| पनवेल | वार्ताहर |
पनवेल- तळोजा येथून सायकलवरून नावडे येथे मासे पकडण्यासाठी जाताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तम मंडळ (51) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या सायकलस्वाराचे नाव असून, ते तळोजा डोंगर्याचा पाडा येथे राहत होते. उत्तम हे शुक्रवारी (दि.04) सकाळी नेहमीप्रमाणे मासे पडकडण्यासाठी त्यांच्या सायकलने मुंब्रा-पनवेल मार्गालगतच्या नावडे येथे जात होते. दरम्यान, ते या मार्गावरील एल अॅण्ड टी कंपनीसमोर आले असताना भरधाव आलेल्या वाहनाने त्यांच्या सायकलला जोराची धडक दिली. या अपघातात उत्तम गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती तळोजा पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी या अपघाताला कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.