| पनवेल | वार्ताहर |
कॅटरर्सकडे काम करणार्या कामगारांमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या वादातून एकाचा मृत्यू झाला आहे. खारघर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ओवे कॅम्प येथील भोईर चाळीत राहणार्या सोनुकुमार उर्फ सोनू महेंद्रकुमार यादव, सुग्रीम उर्फ सुरज चौधरी निशाद हे कैंटरर्स जगदीश बुटोलिया यांच्याकडे मजुरीचे काम करित होते. त्यांचा तिसरा सहकारी करणकुमार सुद्धा कामाला होता. सोनुकुमार याच्या घरी काल, तिघे एकत्र आले असताना, मालक बुटोलिया यांच्या मालकीची असलेली स्कुटी कुणी चालवायची यावरून वाद झाला हा वाद विकोपाला गेला. सुग्रीम आणि सुरज यांनी लाकडी दांडक्याने करण याच्या डोक्यात क्रूरपणे प्रहार करून करणला गंभीर जखमी केले. दोघांनीही त्याच्या डोक्यात आणि शरीरावर हल्ला चढविल्यानंतर जखमी अवस्थेत शेजार्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना करणकुमार उर्फ करण (25) याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शितल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस पथकाने घटनास्थळावरून दोन लाकडी दांडे आणि लोखंडी फावडे हस्तगत केले आहेत. शिवाय रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. दोन्ही आरोपींना पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ही हत्या मालकाच्या स्कुटीवरून झाली असली तरी याचा उलगडा तपासाअंती होऊ शकते, असे संकेत मानले जात आहेत.