खोपोलीतील सुभाषनगर डोंगरकडा धोकादायक

तहसीलदार तांबोळी यांनी केली पाहणी
। खोपोली । प्रतिनिधी ।
नगरपालिकेच्या हद्दीतील सुभाषनगर मस्को कॉलनी परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे खालापूर तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी पाहणी करीत धोकादायक परिसरात संरक्षण जाळी टाकण्याबाबत खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याशी चर्चा केली आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या सुभाषनगर परिसराला दर पावसाळ्यात धोकादायक घोषित केले जाते. साधारणपणे हजार लोकसंख्या असलेल्या सुभाषनगर परिसराला धोकादायक डोंगरकड्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ व रायगड संघर्ष समिती करीत आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सुभाषनगर परिसराची अवस्था पुण्याच्या माळीण गावासारखी होऊ नये, यासाठी पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव खलील सुर्वे व राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी संरक्षण भिंत उभारण्याची आग्रही मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी साईबाबा मंदिर, मस्जिद परिसर व गणेश मंदिर परिसरातील डोंगरकड्याची पाहणी करून धोकादायक भागात तात्काळ संरक्षण जाळी टाकण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून संबंधित विभागांशी चर्चा करून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे यावेळी तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी सांगितले. यावेळी पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ, राहुल जाधव, फिरोज पिंजारी, खलील सुर्वे, तलाठी कवळे, खोत अण्णा, रमाकांत बेहरे, खोपोली नगर परिषदेचे लगाडे, इंजि. शितिष हडप आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version