आदिवासी महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
| उरण | वार्ताहर |
कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा स्पष्ट आदेश, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे आणि मंडळ अधिकारी जासई यांचा स्पष्ट अहवाल असताना कारवाई करण्यात उपविभागीय अधिकार्यांकडून होत दिरंगाईबाबत मुक्ता कातकरी ही आदिवासी महिला मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसली आहे. याबाबत हकीकत अशी की, दिघोडे तालुका उरण येथील पाच एकर जमीन गोपाळ लहान्या कातकरी यांच्या नावावर होती.
तत्कालीन तलाठी याने त्यांच्या मृत्यूनंतर वारस नोंद करताना सदरहू आदिवासी खातेदाराची जमीन मिळकतीच्या सात बारा सदरी इतर समाजातील चार घरत नावे केली आहे. मंडळ अधिकारी आणि तहसीलदार उरण यांनी सदरहू फेरफार रद्द करून गोपाळ लहान्या कातकरी यांचे कायदेशीर वारस नोंद करण्यात यावी, असे आदेश कोकण आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी दिले आहेत. मात्र, उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके यांनी अपिलाच्या वेळी तारखावर तारखा देऊन वेळकाढूपणा केल्याचा आरोप मुक्ता कातकरी यांनी आहे. या विरोधात त्या आमरण उपोषणाला बसल्या आहेत. या अगोदर त्यांनी उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण केले होते. तरीही अजून न्याय मिळत नाही.
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई 95 गाव समिती आणि विरार अलिबाग कॉरिडॉर समितीचे पदाधिकारी सुरेश पवार, रायगड जिल्हा कातकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान नाईक , सामाजिक संघटना पेण येथील श्री किशोर म्हात्रे, श्री राजेंद्र म्हात्रे , युवा सामाजिक संस्था जसखार उरणचे किशोर म्हात्रे , रानसई येथील सामाजिक कार्यकर्ते पद्माकर शींगवा आदी मान्यवरांनी आणि त्यांच्या संघटनांनी पाठिंबा दिला.