| पनवेल | प्रतिनिधी |
गॅस तुटवड्यामुळे लाकूड, कोळसा आणि ईलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली आहे. पनवेल शहरात ढाबाचालकांनी लाकडाच्या चुलीचा आधार घेत काही दिवसांपासून चुलीवर जेवण तसेच इतर खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे. शहरांमध्ये गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल आणि घरगुती स्वयंपाकासाठी पर्यायी इंधनाचा वापर वाढला आहे.
गॅसपुरवठा बंद झाल्याने काही व्यवसाय सध्या बंद आहेत. पनवेल संपूर्ण तालुक्यात जवळपास 50 पेक्षा जास्त लहान-मोठे ढाबें असून त्यांच्यावर गॅस तुटवड्यामुळे संकट ओढवले आहे. वीकेण्डला खास आगरी पद्धतीच्या जेवणाच्या बेतासाठी अनेकजण ढाबे गाठतात. मात्र, गॅस सिलिंडरच उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. यावर उपाय म्हणून हॉटेलमालकांनी चुलीवरच्या जेवणाचा पर्याय स्वीकारला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे लाकूड आणि कोळशाच्या दरातही 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. हॉटेल आणि खानावळीत लाकूड-सरपण, कोळसा आणि पारंपरिक शेगड्यांचा वापर सध्या वाढला आहे. ईलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी अचानक वाढली असून, दुकाने आणि ऑनलाइन विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत.
लाकडाच्या किमतीत वाढ
मागणी वाढल्याने लाकडांच्या दरातही वाढ झाली आहे. पूर्वी 4 ते 5 रुपये किलो दराने मिळणारे लाकूड आता 8 ते 12 रुपये किलो दराने विकले जात आहे. उद्भवलेल्या संकटामुळे खवय्यांना मात्र अस्सल चुलीवरची चव चाखायला मिळत आहे. मात्र, गॅसटंचाईअभावी हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक गणित बिघडले आहे.गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने व्यवसाय बंद न ठेवता लाकडांच्या आधारे चूल पेटवण्याचा निर्णय आम्ही घेतला. यामुळे जेव्रणाची चव वाढतेच, ग्राहकदेखील समाधानी होत आहेत. गॅसच्या तुलनेत यासाठी मेहनत जास्त असली तरी ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी चार दिवसांपासून आम्ही ग्राहकांना चुलीवरचे जेवण देत आहोत. संजय पोपेटा, ढाबाचालक, पनवेल
