। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा वसाहतीत काही राजकीय व्यक्तींकडून जवळपास दोन हजार बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदारांसाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या गृहभेट देवून फेर तपासणी करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पनवेल निवडणूक विभागाकडे केली आहे.
पनवेल महापालिकेची निवडणूक पुढील काही दिवसात होणार असल्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सर्वच राजकीय कार्यकर्ते कामाला लागले आहे. आपापल्या प्रभागात जास्तीत जास्त मतदारांची नोंद व्हावे यासाठी काही राजकीय कार्यकर्त्यांकडून नवीन मतदारांचेनाव नोंदणी साठी अर्ज भरले जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार तळोजा फेज-1 आणि 2 वसाहतीत मधील तसेच वसाहती बाहेरील काही कामगार तळोजा वसाहत आणि परिसरातील गावात भाड्याने वास्तव्य करीत असल्याचे दाखवून बोगस भाडेकरार जोडून नवीन मतदारांची बोगस मतदार नोंदणी करण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडे तळोजा फेज- 1 आणि 2 तसेच परिसरातील नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची फेर तपासणी करुन बोगस मतदार शोधून काढावे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी पनवेल निवडणूक विभागाकडे केली आहे.
तळोजा वसाहतीत बोगस मतदारांची नोंदणी झाली असेल आणि या विषयी तक्रार प्राप्त झाल्यास पाहणी केली जाईल.
विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल