| रसायनी | वार्ताहर |
रसायनीतील वासांबे मोहोपाडा बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांचे कडधान्य विक्रीसाठी येऊ लागले आहे. नागरिकांकडून कडधान्यांना चांगली मागणी आहे. तसेच चांगला भाव मिळत असल्याने विक्रेते समाधान व्यक्त करत आहेत.
सध्या पौष्टीक आहाराकडे अनेकजण वळले आहेत. त्यामुळे प्रोटीनयुक्त कडधान्यांना मागणी वाढत आहे. रसायनी परिसरातील चावणे, आपटे, वडगाव, मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या भातपिकानंतर दुबार जास्त करून वालासह चवळी, हरभरा, मटकी, मूग आदी प्रकारच्या कडधान्यांचे पीक घेऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी कडधान्यांच्या पेरणीनंतर मध्यंतरी खराब हवामान असल्याने परिणामी किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कडधान्यांच्या उत्पादनाला फटका बसला असल्याने पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. तर झाडांना शेंगा चांगल्याप्रकारे आल्याने शेतकरी कडधान्यांसह शेंगा बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहे. शिवाय त्याला चांगला भावदेखील मिळत आहे. दरम्यान, वासांबे मोहोपाडा येथील बाजारपेठेत मागील चार ते पाच दिवसांपासून वाल, मूग, चवळी, गावठी हरभरा आदी कडधान्य विक्रीसाठी येऊ लागले आहेत. यामध्ये वाल 180, चणा, मूग, मटकी आणि चवळी 170 रुपये किलो भावाने विकले जात असल्याचे पोयंजे येथील विक्रेत्या कलावती ठाकूर यांनी सांगितले. सध्या आवक कमी असल्याने भाव जास्त आहे. मात्र, आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील, अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. येथील स्थानिकांच्या गावठी कडधान्यांना आवर्जून पसंती देतो, असे ग्राहक शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
रसायनीत गावठी कडधान्यांना मागणी
