। पालघर । प्रतिनिधी ।
मोखाडा तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या 154 शाळांमधील 488 वर्ग खोल्या धोकादायक अवस्थेत आहेत. तर, शौचालयांची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्याशिवाय संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक व्यवस्थेचे कामकाज ज्या ठिकाणी चालते त्या गट संसाधन केंद्रासह 26 समूहसाधन केंद्रे ही दुरूस्तीसाठी निधीच नसल्याने अक्षरशः बेवारस अवस्थेत पडून आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राथमिकत: भौतिक सुविधा देणे विधीसंमत असतांनाही जिल्हा परिषद व शिक्षण विभाग त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालकांमधून केला जात आहे.
मोखाडा तालुक्यात शासनाने लाखो रूपयांचा निधी खर्च करून 13 केंद्रप्रमुखांसाठी समूहसाधन केंद्रे बांधलेली आहेत. मात्र, सुर्यमाळ येथील एकमेव समूहसाधन केंद्राचा अपवाद वगळल्यास इतर 12 ठिकाणची समूहसाधन केंद्रे ही विनावापर पडून असल्याने या केंद्रांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. ती जनावरे आणि मद्यपींची आश्रयस्थाने झालेली आहेत. या केंद्रांमधून केंद्रप्रमुखांनी आपल्या अखत्यारीतील शाळांचा कारभार पहाणे क्रमप्राप्त असतांनाही याठिकाणी कोणताही केंद्रप्रमुख हजेरी लावीत नसल्याने या समूहसाधन केंद्रांची दुरवस्था झालेली आहे.