। पालघर । प्रतिनिधी ।
जव्हार तालुक्यात आरोग्यसेवा हा मुद्दा नेहेमीच ऐरणीवर असतो. शहरातील 100 खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीक अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्य चिकित्सकपदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकांसह 27 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचार्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे.
तसेच या रुग्णालयात प्रसूति व स्रीरोग तज्ज्ञ, सर्जन, फिजीशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ तसेच भूलतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवा देताना मर्यादा येऊन रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक, सेलवास, ठाणे येथे पाठविले जात आहेत. सध्या उपजिल्हा रुग्णालयाकडे 107 मंजूर पदे आहेत. त्यातील 27 विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण येत असून, त्याचा रुणसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात आरोग्य विभागाचे येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका आरोग्य सेवेला बसत आहे.