स्थानिक पोलीसांचा अवैध धंद्यावरील अंकूश संपण्याच्या मार्गावर
| अलिबाग | कृषीवल टीम |
रायगड जिल्ह्याला गेल्या महिन्यांपासून डिझेल तस्करीने विळखा घातला आहे. डिझेल तस्करीमुळे जिल्ह्यातील रेवदंडा, मांडवा, पेण अशा अनेक सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनाऱ्यांना असुरक्षितता निर्माण झाली आहे. डिझेल माफियासह तस्कर मोकाट आहेत. त्यांच्यावरील स्थानिक पोलिसांचा अकुंश कमी होऊ लागला आहे. त्यामुळे हा धंदा तेजीत सूरू असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
सागरी किनारे सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारी 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेरांच्या मदतीने किनाऱ्यावरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. तरीदेखील जिल्ह्यातील रेवदंडा बंदर, धरमतखाडी, रेवस जेट्टी व अन्य जेटींमधून छुप्या पध्दतीने मध्यरात्रीमध्ये डिझेल तस्करी करण्यात आली आहे. सागरी किनारी असलेले अनेक पोलीस ठाणे बंदराच्या व डिझेल तस्करीच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आहेत. तरीदेखील तेथील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात डिझेल तस्करीने मोठ्या विळखा घातला आहे. या विळख्यात स्थानिक काही मंडळीदेखील सहभागी होऊन आर्थिक लुट करीत असल्याचे बोलले जात आहे.
समुद्रातील मोठ मोठ्या जहाजातील सारंग व अन्य व्यक्तीशी संपर्क साधून त्या जहाजमधील डिझेल 60 रुपये लिटरने डिझेल माफिया तस्करी करीत आहेत. रात्रीच्यावेळी खाडी किनारी जहाज लावून टँकरद्वारे डिझेल भरून तो रस्त्याने अन्य ठिकाणी विकण्यासाठी नेला जातो. हा प्रकार उघड असतानाही डिझेल माफिया मोकाटपणे समाजात वावरत आहे. काही ठिकाणी या डिझेल माफियांवर वर्षभर कारवाईदेखील पोलीस करीत नसल्याचे उघड आहे. आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी डिझेल माफियांना सावरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप अनेक जाणकरांकडून केला जात आहे. सागरी मार्गाने होणाऱ्या या डिझेल तस्करीवर अंकुश राहिला नसल्याचे चित्र आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील डिझेल तस्करांना पोलिसी दणका द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
तसेच, डिझेल तस्करीमुळे मच्छीमारांच्या जाळी तुटणे, अडथळा आणणे, गरीब मच्छीमारांना मारहाण करण्याचे अनेक प्रकार घडतात. त्यावर पोलीस कारवायादेखील करतात. मात्र, तरीही डिझेल तस्करीचे काळे धंदे अवैधरित्या सुरुच आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी आवाज उठवित केंद्र शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. तसेच, डिझेल तस्करीचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही केली होती. मात्र, सरकारने त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळ केल्याचे दिसून येत आहे.
गुन्हेगारांकडून न्यायालयाचा अवमान
तस्करांच्या टोळीवर यलो गेट पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात आरोपींनी अटक करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जामिनामध्ये आरोपींना रायगड जिल्ह्याच्या किनारी जाऊ नये, तसेच डिझेल तस्करी न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आरोपींनी न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत जिल्ह्यातील अन्य समुद्र किनारी तसेच खाडीकिनाऱ्यांवर खुलेआमपणे तस्करी सुरु केली आहे.
सोसायट्यांचे डिझेल कोणी घेईना
डिझेल तस्कर समुद्रात व खाडीकिनारी मासेमारी करणाऱ्या बोट मालकांना तसेच काही पेट्रोल पंपधारकांना कमी भावाने डिझेल देतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारी सोसायटीचे डिझेल कोणी घेत नसून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. त्यामुळे डिझेल तस्करी करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करुन शिक्षा करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
डिझेल तस्करीवर झालेली कारवाई
मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवखार येथील धरमतर खाडी 18 जूलै 2019 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास डिझेल तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 21 लाख 68 हजार 384 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 जूलै 2023 मध्ये रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दादर गावाच्या खाडीमध्ये कारवाई करण्यात आली.त्यामध्ये 14 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या रेवदंडा साळाव खाडीमध्ये 27 ऑगस्ट 2023 मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास खोपोली पोलिसांनी कारवाई करीत 17 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, रेवस जेट्टी येथील समुद्रामध्ये 17 जूलै 2024 मध्ये एका बोटीत बेकायदेशीर डिझेलचा साठा आढळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबरच खोपोली पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची महिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यातील किनाऱ्यावरील डिझेल तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत वारंवार कारवाई करण्यात आली आहे. पेण या ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये आरोपी राजू पंडीतला अटकदेखील केली होती. ज्यावेळेला माहिती मिळते त्यावेळेला कारवाई केली जाते.
बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड