| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील शेडुंगमध्ये एका चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरी या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलगी आणि आरोपी एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहे. याच खाजगी सोसायटीमधील लिफ्टच्या बाजूला असलेल्या भिंतीलगत ज्येष्ठ नागरिकाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हरी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ नराधम आरोपी हरी याला अटक केली आहे. आरोपीला पनवेल न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करत आहेत. या घृणास्पद प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.