‘लम्पी स्कीन’ची जिल्हा प्रशासनाला धास्ती

प्रतिबंधाकरिता जिल्हाधिकार्‍यांचे यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

राज्यभरातील जवळपास 17 हून अधिक जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. रायगड जिल्ह्यात अद्याप एकही जनावर बाधित आढळून आलेले नाही. परंतु, जिल्हा प्रशासनाने या रोगाची धास्ती घेतली असून, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आजाराच्या निर्मूलनाकरिता सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शेतकर्‍यांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांची दौलत असलेल्या जनावरांना दृष्ट लागल्यासारखा लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. कीटकांपासून गायी व म्हशीला प्रामुख्याने ङ्गलम्पी स्कीनफची लागण होत आहे. त्यामुळे गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास, नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांना पुढीलप्रमाणे जबाबदारी सोपविली आहे.

महसूल विभाग:- जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणाच्या मदतीने रोग नियंत्रण करणे, जनावरांचे बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्याचे प्रदर्शन आयोजित करणे, प्राण्यांचे गट करून कार्यक्रम पार पाडणे यास प्रतिबंध करणे.

पोलीस यंत्रणा:- जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील जनावरांची वाहनातून होणारी वाहतूक प्रतिबंधित करणे, या आदेशाचे पालन न करणार्‍या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी:- जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील जनावरांची वाहनातून होणारी वाहतूक प्रतिबंधित करणे.

ग्रामविकास विभाग:- लम्पी (एलएसडी) या रोगाबाबत गावामध्ये जागृती करणे, सतर्कता बाळगणे, गावामध्ये या रोगाबाबत काही माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळविणे, गोठ्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी करणे, मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे.

भूमी अभिलेख विभाग:- रोग प्रादुर्भाव झाल्यास ईपी सेंटरपासून पाच किलोमीटरच्या अंतरातील गावांचा नकाशा तयार करणे.

पशुसंवर्धन विभाग:- लम्पी (एलएसडी) सदृश / बाधित जनावरे आढळल्यास योग्य ते उपचार करणे. विलगीकरण करणे, नमुने गोळा करणे व तात्काळ प्रयोगशाळेत पाठविणे, आजारी प्राण्यांचा दैनंदिन अहवाल तयार करणे, उपचार करणे, नमुने होकारार्थी आल्यास

5 किलोमीटरच्या अंतरातील गावामध्ये लसीकरण करणे.
मुख्य अधिकारी नगरपरिषद (सर्व):- लम्पी (एलएसडी) या रोगाबाबत शहरामध्ये जागृती करणे. सतर्कता बाळगणे, शहरामध्ये या रोगाबाबत काही माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्षास कळविणे. गोठ्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी करणे, मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे.

जिल्हा सहनिबंधक, सहकारी संस्था:-
कृषी उत्पन्न बाजार समितीत प्राण्यांचे सर्व प्रकारच्या खरेदी-विक्रीचे बाजार भरविण्याबाबत बंदी घालणे. जनावरे खरेदी-विक्रीसाठी एकत्रित न आणणे.

संबंधित सर्व यंत्रणांनी निश्‍चित करण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

Exit mobile version