शेकापच्या लढ्याला यश; दोन महिन्यांचे मानधन खात्यात जमा
| रायगड | प्रतिनिधी |
आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस काम करणाऱ्या आशा सेविका आर्थिक संकटात सापडल्या होत्या. दिवाळीचा सणजवळ आला तरी आशा सेविकांचे तब्बल पाच महिन्यांचे मानधन रखडले होते. शासनाकडून मानधन मिळावे यासाठी रायगड जिल्ह्यातील आशा सेविकांनी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची भेट घेत आपली व्यथा मंडळी होती. आशा सेविकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चित्रलेखा पाटील आक्रमक होऊन त्यांनी आशा सेविकांच्या पाटीशी शेकाप कायम असून, चार दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. शेकापने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शासनाने नमतेघेत आशा सेविकांचा दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. शेतकरी कामगार पक्षाने आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा इशारा दिल्याने आशा सेविकांची दिवाळी गोड झाली आहे.
अपूऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शासन शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरत असल्याने शासनाने ग्रामीण भागात स्थानिक महिलांची मदत घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी आशा सेविका पद नियुक्त करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजारहून अधिक आशा सेविका आहेत. आशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या योजना घराघरात पोहचविणे, आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देणे, माता, बाल मृत्यूचे प्रमाण टाळणे, बालक व मातेचे आरोग्य राखण्याबरोबरच जन्म, मृत्यूची नोंद ठेवणे, बालकांसह मातांचे लसीकरण करणे. गावांतील प्रसूत महिलेला दवाखान्यात नेण्यापासून त्यांचे आरोग्य राखण्यासाठी सहकार्य करण्याचे काम आशा सेविका भगिनी करतात. कृष्ठरोग व इतर साथीच्या आजारांवर उपाय करण्यासाठी अंमलबजावणी करणे. जनजागृती करणे अशा अनेक प्रकारची कामे आशा सेविका करतात. आयुष्यमान, आभाकार्ड काढण्यासाठी गावागावात प्रचार व प्रसार करण्याचे कामही आशा सेविका करीत असतात. असे असतानाही आशा सेविकांना पदरमोड करीत आपली कामे करावी लागतात. या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
राज्य शासनासह केंद्र शासनाच्या योजनांची कामे आशा सेविकांमार्फत केली जातात. केंद्राचे काम केल्यास राज्य शासनाकडून त्यांना दर महिन्याला मानधन दिले जाते. परंतु, गेल्या जून महिन्यापासून आशा सेविकांना मानधनच देण्यास सरकार उदासीन ठरले आहे. दर महिन्याला मानधन वेळेवर मिळत नसल्याने आशा सेविकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. शासनाच्या सर्व योजनांची कामे केली जातात. परंतु, त्यांना शासनाचा दर्जा दिला जात नाही. ऑनलाईन कामे आशा सेविकांकडून करून घेतले जातात. परंतु, लागणारी यंत्रणा, पुरेसा रिचार्ज भत्ता दिला जात नाही. आशा सेविकांना राबविले जाते. परंतु, शासनाच्या मानधनापासून अनेक सुविधा दिल्या जात नाहीत. अनेक वेळा आशा सेविकांनी याबाबत मागणी केली आहे. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही.
गणेशोत्साबरोबरच नवरात्रौत्सव सण मानधनाविनाच गेला. दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे, तरीदेखील मानधन देण्यास शासनाकडून कोणत्याही हालचाली सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे आशा सेविकांनी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची शेकाप भवन येथे भेट घेतली. समस्यांचा पाढा वाचून दाखविला. आशा सेविकांच्या या प्रश्नांबाबत चित्रलेखा पाटील आक्रमक झाल्या. सरकारच्या भुमिकेबाबत संताप व्यक्त करीत चार दिवसांत आशा सेविकांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला होता. शेकापच्या आंदोलनाच्या पवित्र्याने आशा सेविकांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा 20 हजार रुपये मानधन जमा झाले आहे.





