। सिडनी । वृत्तसंस्था ।
ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवडयाहून कमी अवधी शिल्लक असतानाही नोव्हाक जोकोव्हिचच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम होती. मात्र, आता वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आहे. जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचलाही त्यात स्थान मिळाले आहे.
यासोबतच प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियन जोकोव्हिचा सहभागही निश्चित झाला आहे. जोकोव्हिच आपल्या पहिल्या सामन्यात मिओमिर केकमानोविचशी भिडणार आहे.
नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन-2022 मधील त्याच्या सहभागाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र जोकोव्हिचने तेथील कोर्टात ऑस्ट्रेलियन सरकारविरुद्ध लढा दिला आणि केस जिंकण्यात यश मिळवले. मेलबर्न कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारला नोव्हाक जोकोव्हिचच्या पासपोर्टसह सर्व वस्तू तातडीने परत करण्याचे आदेश दिले. व्हिसा रद्द झाल्यानंतर जोकोविच चार दिवस इमिग्रेशन विभागाच्या हॉटेलमध्ये थांबला होता. जोकोव्हिचवर करोनाची लस न घेतल्याचा आरोप होता, तर ऑस्ट्रेलियात याबाबत कडक कायदे आहेत.
विशेष म्हणजे, गतवर्षी डिसेंबर महिन्यात करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतरही विलगीकरण करण्याऐवजी एका वृत्तपत्राला मुलाखत देण्यासाठी घराबाहेर पडणे महागात पडले, असा खुलासा सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने बुधवारी केला होता.
- कठीण कालखंडात तुम्ही सर्वानी पाठिंबा दिल्यामुळे मी आभारी आहे. एका प्रतिष्ठित वृत्तपत्राला शब्द दिल्यामुळे त्या कामानिमित्त घराबाहेर पडलो. तेव्हा वेळीच विलगीकरण केले असते, तर माझ्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशावर इतका वाद उद्भवला नसता – जोकोव्हिच,टेनिसपटू