| पनवेल | प्रतिनिधी ।
कळंबोली वसाहती मधील मुख्य रस्त्यावरून आपल्या इसयुई गाडीने हॉस्पिटलमध्ये जात असताना सत्यम हॉस्पिटलचे मालक संजय बरनवाल यांनी तिघांना उडवत गंभीर जखमी केले आणि सुसाट गाडी रस्त्यावरील फुटपाथवर चढून एका दातांच्या डॉक्टरांच्या दवाखान्याला जाऊन धडकली. सदरचा प्रकार हा सोमवारी सायंकाळच्या दरम्यान घडल्याने प्रचंड मोठा जमाव जमला. तात्काळ कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
संबंधित डॉक्टरला त्याच्या अपघाती गाडीसह ताब्यात घेऊन त्यांना कळंबोली पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन लहान पादचारी मुलांचा व एका व्यक्तीचा समावेश आहे.
कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटलचे मालक डॉक्टर संजय बरनवाल हे आपल्या एसयुइ या ऑटोमॅटिक मोटर कारने कळंबोलीमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये जात होते. सुधागड विद्या संकुलाच्या दिशेने ते आपल्या हॉस्पिटलकडे जात असताना भवानी दुध डेअरीच्या समोरील एका मोटारसायकला त्यांनी प्रथम उडवले. त्यानंतर तीन मोटारसायकल उडवल्या. नंतर भांबावलेल्या डॉक्टरने अचानकपणे भरधाव गाडी उजव्या बाजूला वळवल्याने समोरील रस्त्यावरून चालणाऱ्या दोन लहान मुलांनाही त्यांनी जोरात ठोकर मारून उडवले. तसेच फुथपाथच्या बाजूला उभ्या असलेल्या एका स्कुटीला जोरदार धडक मारून स्कुटीचा पूर्ण चक्काचूर त्यांनी केला. त्यामध्ये स्कुटी चालक ही गंभीर जखमी झाला आहे. गाडीचा वेग थांबत नसल्याने गाडी रस्त्यावरून फुटपाथ वर चढली व फुटपाथ वरून समोरील सुभाष मिश्रा यांच्या पिनाकी दातांच्या दवाखाना व विजय फोटो स्टुडिओच्या मधील पिलरला जाऊन धडकली. जर दातांच्या दवाखान्यात घुसली असती तर दवाखान्यामध्ये उभे असलेले पेशंट हे गंभीर जखमी झाले असते.







