मराठा महासंघासाठी समाजमंदिर उभारणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
समाजाच्या कार्यात महिलांचा समावेश करुन घ्या. महिला वेगळे काम करतात. समाजात राजकारण आणू नका राजकीय पुढार्यांना बोलावू नका असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

सकल मराठा समाज सामाजिक संस्थेसाठी आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथे समाजमंदिर उभारण्यात येणार आहे. यावेळी आ. जयंत पाटील यांनी त्याबाबतचे पत्र समाजाला दिले. त्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आ.जयंत पाटील यांना धन्यवाद देण्यासाठी समाजाच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार धैर्यशिल पाटील, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष नरेश सावंत आदी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यावेळी म्हणाले की, समाज म्हणून काम करणार्यांवर राजकारणाचा शिक्का नसला पाहिजे. राजकीय शिक्का बसला की कामात आडकाठी येत असते. समाजासाठी वाहून जाणारे अनेक कार्यकर्ते आहेत. समाजमंदिर अद्यावत व्हावा. मेंटेंनंन्स कसे होईल याचे देखील नियोजन व्हायला हवे. या समाजमंदिराच्या सभागृहाला स्व. प्रविण कदम यांचे नाव देण्याची विनंती यावेळी जयंत पाटील यांनी केली. समाजाच्या कमिटीने चांगला पाठपुरावा केल्याचे सांगून जयंत पाटील यांनी कौतुक केले.
माजी आमदार धैर्यशिल पाटील म्हणाले की, जातीपेक्षा समाजाचे पुढारपण करण्याची संधी त्यांच्या कर्तुत्वाने प्राप्त होत असते. जयंत पाटील हे असे व्यक्तीमत्व आहे की सर्व समाजाचे पुढारपण करत आहेत. त्यातून मिळणारी सत्ता ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत राबवण्याची भुमीका जयंत पाटील यांनी घेतली.
सचिव उल्हास पवार यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी उपाध्यक्ष कृष्णा जाधव, सहसचिव अनिल गोळे, युवा अध्यक्ष समरेश शेळके, उपाध्यक्ष्ज्ञ प्रसाद गायकवाड, सुमित माने आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.