| मुंबई | प्रतिनिधी |
अजित पवार यांच्याबरोबर ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली, ते वगळता सर्वांना आमची दारे खुली आहेत. काहीकाळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू. एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शपथविधीला उपस्थित राहून हे कृत्य पक्षशिस्त तसेच पक्षाची ध्येय धोरणे यांच्या विरोधात आहे. त्यामुळे ही कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी संगत नाही आणि त्यामुळे ही बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येत आहे असं राष्ट्रवादीच्या पत्रकात म्हटलं आहे. बडतर्फ केलेल्यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव चिन्ह वापरता येणार नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन सांगितलं की, पक्षाने ठरवलेला व्हिप हा अंतिम असतो, आणि जितेंद्र आव्हाड हेच राष्ट्रवादीचे व्हिप असतील. मी त्यांना जो आदेश देईन आणि ते जे सांगतील ते सर्व आमदारांना लागू होईल. ज्या वेळी या नऊ जणांनी शपथ घेतली त्याच वेळी ते अपात्र ठरले असून यासंबंधित पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिले असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
येत्या 5 जुलै रोजी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल, अशी खात्री व्यक्त करतानाच, शरद पवार यांच्याबरोबर असणारा आणि पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी होईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
बापाला विसरणार नाही- अमोल कोल्हे
अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्वीट करत शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं अमोल कोल्हे यांनी जाहीर केलं. जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो| शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है , पर दिल कभी नहीं| मी_ साहेबांसोबत, असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.