| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने दादर परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एक आरोपी पश्चिम बंगालचा असल्याची माहिती समोर आली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता तब्बल 5 किलो एमडी ड्रग्स आढळले. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर माटुंगा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची तस्करी कुठून आणि कुठे केली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबईसह उपनगरांमध्ये अमली पदार्थांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी पोलिसांनी आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर दादरमध्ये केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी सुरू केली असून, यामागे मोठे ड्रग रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी कोणाचे या रॅकेटमध्ये कनेक्शन आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दोन आरोपींची पोलीस कोठडी मिळवून तपास अधिक वेगाने केला जाणार आहे.