दाट धुक्याने महामार्गावरील वाहतूक मंदावली

| सुकेळी | वार्ताहर |

सोमवारी सकाळी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे तसेच महामार्गावरील उडणार्‍या प्रचंड धुरळ्यामध्ये संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग हरवला होता. जणू काही महामार्गावर धुक्याची चादर पसरली होती. दरम्यान, वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे वाहतूक पूर्णत: धिम्या गतीने सुरु होती. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. त्याचप्रमाणे वातावरणातदेखील मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता.

रायगड जिल्ह्यात सर्वत्र धुके पडल्यामुळे थंडीचे प्रमाणदेखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर, ब्लँकेट व चादरीचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत धुक्याचे प्रमाण एवढे होते की, वाहनचालकांना वाहने चालवताना समोरचे 9 ते 10 फूट अंतरावरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करुन ठेवली होती. काही वेळाने धुक्याचे प्रमाण कमी झाल्यानंतरच पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Exit mobile version