श्रावणात घननीळा न बरसल्याने हिरवीगार शिवार कोमेजली

बळीराजा धास्तावला,मोठ्या पावसाची प्रतीक्षा


| मुरूड जंजिरा| प्रतिनिधी |

श्रावणात घननीळा बरसल्या.रिमझीम येती धारा…हे श्रावणातील पावसाच्या सरींचे वर्ण करणारे गीत यावेळी वरुणराजाने आळविलेच नाही. उलट ऐन श्रावण पावसाविना कोरडाठाक गेला. चक्क तापमान 28 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने सारेच हवालदिल झाले आहेत.भातशेतीला पुरेसा पाऊस न झाल्याने ती सुद्धा कोरडी पडल्याचे विदारक दृष्य सर्वत्र दिसत आहे. पावसाने ऐन वेळी दडी मारल्याने मुरूड तालुक्यातील बळीराजा धास्तावला आहे. भात शेतीसाठी पावसाची गरज असताना फक्त अधूनमधून श्रावण सरीच बरसत आहेत .त्या मुळे भात शेती पिवळी पडून सुकली आहे. वाढत्या तापमानामुळे ताप,सर्दी खोकला आदी प्रकारातील आजारी रुग्ण वाढले आहेत.

पाऊस नसल्याने जमिनीत पाण्याची उफळ झालेली नाही. अशातच कडक ऊन पडत असल्याने तापमान वाढते असून शुक्रवारी तापमान पारा 28 वर पोहोचला आहे.हवामान खात्याकडून कोकणात 25 ऑगस्ट नंतर पाऊस बरसायला सुरुवात होणार असल्याचे वृत्त येत असले तरी शेतकरी याबाबत सांशक दिसून येत आहेत. मुरूड तालुक्यात भात शेती हे मुख्य पीक असून येथे अद्याप बहुतेक ठिकाणी पारंपरिक शेती केली जाते.शेती कामा साठी मजुरीचे दर वाढले आहेत.मजूर देखील मिळत नाहीत.शेती करणे परवडत नाही.त्यामुळे अनेक तरुण नोकरीच्या शोधार्थ मुंबई, पुण्याकडे गेल्याचे दिसून येते.

भारत शेतीप्रधान देश असला तरी कोकणात युवापिढीला आधुनिक पध्दतीने भात शेती बरोबरच अन्य पूरक पिके कशा प्रकारे घेता येतील याचे प्रभावी समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. युवकांना सहकारी संस्था, वित्तीय बँका, यातून सुलभ अर्थसहाय्य आणि प्रभावी मार्गदर्शन झाल्यास नोकरीच्या शोधार्थ बाहेर जाणारा युवकांचा लोंढा थांबू शकेल.


काशीनाथ करजेकर, शेतकरी

खारआंबोली येथील युवा शेतकरी समीर बेडेकर यांनी सांगितले की,पावसाने दडी मारल्याने खारआंबोली ते तेलवडे गावा पर्यंतच्या भात शेती जमिनीला भेगा पडून रोपे पूर्णपणे पिवळी पडली आहेत.आता जरी पाऊस पडला तरी भात रोपे जीव धरू शकणार नाहीत. तालुक्यात अधुन मधून पावसाच्या सरी पडत असल्या तरी फारसा दम दिसून येत नाही.

मुरूड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन हे चार तालुके डोंगरी तालुके असूनही येथिल परिसर हिरव्यागार वनश्रीने बहरलेला असतो.विशेषतः पावसाळ्यात तो आधिक खुलतो.मुरूड कडून तळा, श्रीवर्धन कडे जाताना भात शेती पिकाची हिरवीगार रोपे डौलाने सळसळत असतात.परंतु सध्या पावसाने दडी मारल्याने छोट्या रोपांवर पिवळी छाया पसरत चालली आहे.पावसाच्या लहरीपणा मुळे शेतकरी चिंताग्रस्त बनल्याचे ग्रामीण भागात फिरताना दिसून येऊ लागले आहे.

Exit mobile version