| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ सारख्या वेगाने नागरीकरण होत असलेल्या शहर वजा गावातील कचर्याच्या संकलन केल्या जात असलेल्या मच्छर डेपोमध्ये दररोज कचरा पेटविला जात आहे. त्या ठिकाणी जाळण्यात येत असलेल्या कचरा डेपोमधून बाहेर निघणारे धुराचे लोट यामुळे परिसरातील अनेकांना श्वसनाचे आजार जडू लागले असून त्याबद्दल कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाने तेथील धुराचे लोट थांबविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातून तेथे असलेली रुग्णालये, पॅथेलॉजिकल लॅबोरॅटरी,रासायनिक प्रयोग शाळा तसेच घरगुती ओला-सुका कचरा यांच्यापासून निर्माण होणार कचरा याचा समावेश आहे.या सर्व कचर्याची विल्हेवाट लावताना यावर पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत दिलेल्या अधिसूचनांचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नसून सरसकट संपूर्ण कचरा जाळला जातो. नेरळ (माथेरान) व संबंधित संपूर्ण परिसर हा ग्रीन झोन असून सुद्धा ग्रामपंचायती मार्फत कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता थेट नित्य-नियमाने सरसकट कचरा जाळला जात असून वायू प्रदूषणामुळे परिसरातील जनतेला निघणार्या धुराचा मोठा त्रास होऊ लागला आहे.
दररोज रात्री धुरांच्या लोट सुरु असतात त्यावेळी दुर्गंधी देणारे वायू यांचा देखील हवेबरोबर प्रवाह सुरु असतो. त्यामुळे धामोते गाव आणि नवीन वसाहत तसेच कोल्हारे गाव आणि नवीन वसाहत आणि बोपेले गाव तसेच नवीन वसाहत मध्ये राहणारे लोकांची झोप उडाली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढले असून प्रदूषण नियंत्रक मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन कायदेशीर करवाई करावी अशी मागणी हजारे यांनी केली आहे. सदरचा कचरा जाळल्यामुळे ज्येेष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रीया आणि लहान मुले या सर्वाचे आरोग्य धोक्यात आले आहे.