शेकडो हातांनी उचलला संवर्धनाचा वसा
| महाड | प्रतिनिधी |
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या परिसरातील ऐतिहासिक दौलतगडाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दुर्गप्रेमी आणि शिवभक्त मोठ्या उत्साहाने पुढे सरसावले आहेत. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे पडझडीच्या अवस्थेत पोहोचलेल्या या गडाच्या संवर्धनासाठी दौलतगड प्रतिष्ठान, दासगाव आणि रॉयल रायगडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे आणि 30 मे रोजी श्रमदान मोहीम राबविण्यात आली.
कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करता शेकडो दुर्गसेवकांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात गडावरील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि पुनरुज्जीवनासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मनुष्यबळ मर्यादित आणि काम अत्यंत जिकिरीचे असतानाही स्वयंसेवकांनी गड संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.
प्रशासकीय स्तरावर दीर्घकाळ कोणतेही संवर्धन न झाल्याने गडावरील बुरुज, चौथरे आणि इतर वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. या पार्श्वभूमीवर दौलतगड प्रतिष्ठानने चार वर्षांपूर्वी गडाला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प केला. त्यानुसार नियमित स्वच्छता मोहिमा, शिवजयंतीनिमित्त भव्य मशाल महोत्सव आणि विविध संवर्धन उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
दोन टप्प्यांत झालेल्या या मोहिमेत दुर्गसेवकांनी गडावरील मुख्य चौथऱ्याची दुरुस्ती केली. तसेच प्राचीन तलावात साचलेला गाळ काढून पाण्याचे स्रोत मोकळे करण्याचे महत्त्वाचे कामही श्रमदानातून पूर्ण करण्यात आले. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोसळलेले अवजड ऐतिहासिक दगड मानवी साखळीच्या मदतीने उचलून त्यांच्या मूळ जागी पुन्हा बसविण्यात आले. हे काम मोहिमेतील सर्वांत आव्हानात्मक आणि कौशल्यपूर्ण ठरले.
निलेश निवाते,
इतिहास आणि संस्कृतीचे जतन ही केवळ संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक दुर्गप्रेमी आणि शिवभक्ताने या कार्यात सहभागी व्हायला हवे. तसेच शासनानेही दौलतगडाच्या कायमस्वरूपी संवर्धनासाठी तातडीने पुढाकार घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात.
संस्थापक-अध्यक्ष, दौलतगड प्रतिष्ठान









