पर्यावरणपूरक गणेशोत्सव कागदावरच

। रायगड । प्रतिनिधी ।

गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, एकीकडे गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन प्रशासन करत असताना दुसरीकडे बाजारात पीओपीच्या गणेशमूर्ती व प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. थर्माकोलची मंदिरे, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा यांचा सर्रास होणारा वापर यामुळे शहरात खरच गणेशोत्सव पर्यावरणपूरक होणार का? याबाबत पर्यावरणप्रेमी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत.

गणेशोत्सव म्हणजे आनंद, हर्ष, उल्हास याचे पर्व. सगळ्यात पहिल्यांदा गणपतीच्या मूर्तीचे बुकिंग केले जाते. पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे नदी प्रदूषण लक्षात घेता शाडू मातीची मूर्ती घरी आणण्याचे आवाहन केले जाते. मात्र, सध्या बाजारात पीओपीच्या मूर्तींचे स्टॉल सजले आहेत. शाडू मातीच्या मूर्तीही बाजारात आल्या आहेत. मात्र, तुलनेने पीओपीच्या गणेशमूर्तींच्या स्टॉलची संख्या अधिक असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. विसर्जनानंतर या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने मूर्तींची विटंबना होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

सजावटीची प्लास्टिक आरास
गणेशोत्सव घरगुती असो अथवा सार्वजनिक, आरास ही आलीच. पण, या सजावटीच्या सामनातही सर्वाधिक वापर हा प्लास्टिकचा होत असल्याचे दिसून आले आहे. पारंपरिक सजावटीतही प्लास्टिकने शिरकाव केल्याचे चित्र आहे. त्यामुळे, झेंडूच्या फुलांच्या माळा, केळीची पाने, रोषणाईचे दिवे, फुलांच्या माळा हे सर्व काही प्लास्टिकमध्ये उपलब्ध होत आहे. परंतु, कोणतीही कारवाई होत नसल्याने थर्माकोलच्या मखरांचाही वापर बंद झालेला नाही.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी मूर्ती, सजावट, निर्माल्य हे सगळेच पर्यावरणाला हानी करणार नाही, असे वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरणासाठी हानीकारक वस्तूंवर बंदी घालणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, तेव्हा काहीच कार्यवाही झाली नाही. मात्र, जेव्हा गणेशोत्सव जवळ येतो. तेव्हा, पीओपीच्या मूर्ती न वापरण्याचे आवाहन केले गेले. याबाबत लवकर निर्णय घेणे आवश्यक होते. दुसरीकडे प्लास्टिकचे साहित्यही बाजारात आले आहे. ज्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल; तर मूर्ती, सजावटीचे साहित्य हे सर्व काही पर्यावरणपूरकच वापरले पाहिजे.

– सुजित गावंड , पर्यावरणप्रेमी

Exit mobile version