अखेरच्या दिवशी महाडमध्ये मोठी जत्रा
| महाड | वार्ताहर |
महाड येथे साजरा होत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवामध्ये भाविकांच्या सुरक्षेची आवश्यक खबरदारी घेतली जावी आणि यात्रेदरम्यान होणार्या अपघात व दुर्घटना टाळाव्यात, अशा सूचना महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी श्री वीरेश्वर महाराज छबिना उत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केली.
वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव बुधवारपासून सुरू झाला असून 11 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. छबिनाच्या अखेरच्या दिवशी महाडमध्ये मोठी जत्रा भरते. यानिमित्ताने महाडमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने छबिना उत्सवाबाबत केलेल्या नियोजनासंदर्भात प्रांताधिकारी यांनी बैठक घेतली. या वेळी पोलिस उपअधीक्षक शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, वीरेश्वर महाराज देवस्थान समितीचे सरपंच दीपक वारंगे, छबिना उत्सव समितीचे अध्यक्ष विजय जाधव, अनंत शेठ, रमेश नातेकर आदी उपस्थित होते. उत्सवादरम्यान महाशिवरात्रीला निघणार्या जाखमाता देवीच्या पालखी मिरवणुकीचा मार्ग तसेच, 11 मार्चला छबीना उत्सवाला येणार्या तालुक्यातील विविध देवदेवतांच्या पालखीचा मार्ग याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली. उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात दुकानदार, आकाश पाळणे तसेच, इतर करमणूक साधनांची वर्दळ असते. यासाठी देवस्थानकडून परवानगी देण्यात आलेल्या करमणूक साधनांची योग्य ती दक्षता घ्यावी तसेच आवश्यक ठिकाणी पोलिस व पालिका प्रशासनाकडून संरक्षण दिले जावे असेही या वेळी ठरले. पोलिस अधीक्षक शंकर काळे यांनी, यापूर्वी पाळण्यामध्ये अडकलेल्या एका महिलेच्या दुर्घटनेची माहिती देत असे प्रकार भविष्यात घडू नये या करता आकाश पाळणे तसेच, विजेवर चालणार्या सर्व करमणुकीच्या साधनांची मुख्याधिकारी व पोलिस उपअधिक्षक यांनी पंच समितीने पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना द्याव्यात, असे स्पष्ट केले.