| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या महत्वाच्या कर्जत रेल्वे स्थानकात नव्याने सरकता जिना उभारण्याच्या कामाला गती आली आहे. कर्जत स्थानकात सध्या एक सरकता जिना असून आणखी दोन ठिकाणी सरकते जिने मध्य रेल्वेकडून बसविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवरील मुख्य लाईनवर कर्जत हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकात पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेसस गाड्यांना अतिरिक्त इंजिने लावली जातात. त्यामुळे पुण्याकडे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कर्जत स्थानकाला मोठे महत्व आहे. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कर्जत स्थानकात सरकते जिने तसेच उद्वाहन आणि पादचारी पुलंच्या निर्मितीसाठी कर्जत पॅसेजर असोसिएशनकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. या स्थानकात आणखी दोन ठिकाणी सरकते जिने बसविले जाणार आहेत. यात एक सरकता जिना हा फलाट क्रमांकावरील मुंबईकडील बाजूसउभारला जात आहे. त्या ठिकाणी एक उद्वाहन देखील आगामी काळात उभारण्यात येणार आहे. तर, तिसरा सरकता जिना हा कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर उभारला जाणार आहे.