प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेतकरी प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण करून आहेत. सध्या आंब्यांचा हंगाम असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही नव्या जातीचे आंबे पिकवले आहेत. नुकतेच कृषी विभागाने या सर्व नवीन जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
कर्जत तालुक्यातील शेतकरी दुबार शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाताची पिके घेऊन विक्रम करीत आहेत. त्यात आता शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या असून, फळबाग योजनांचा फायदा घेऊन वेगवेगळ्या जातीच्या फळांचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्यांच्या विविध जातींची लागवड करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध जातींच्या आंब्यांच्या उत्पादनांची माहिती तालुक्यातील शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कर्जत येथील भात संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकऱ्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या जातीच्या आंब्याच्या पीकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी सुवर्णरेखा, वनराज, मल्लिका, सिंधू, पायरी, हापूस, तोतापुरी, केशर, रत्ना, जम्बो केशर, दशेरी व लंगडा या जातीचे आंबे ठेवण्यात आले होते. त्यात वदप येथील विनय मारुती वेखंडे यांच्या बागेतील वनराज आणि मल्लिका, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित पाटील यांच्या बागेतील जम्बो केशर आणि रत्ना, एकसल येथील डॉ. प्रदीप मटकर यांच्या बागेतील मल्लिका आणि सिंधू, भानसोली येथील सूर्याजी कडव यांनी तोतापुरी आणि केशर, खडकवाडी पाषाणे येथील काळूराम निरगुडा यांच्या बागेतील पेरू, सरदार, आंबा हापूस आणि केशर, माले येथील रमेश हिसालगे यांनी आम्रपाली व राजापूरी, तर वडप येथील शेतकरी धनराज पाटील यांनी सुवर्णरेखा हा नवीन जातीचा आंबा प्रदर्शनात ठेवला होता. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या आंबा प्रदर्शनाला भेट दिली.