| खरोशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवली येथील विद्यार्थीप्रिय, निष्कलंक आणि सेवाभावी मुख्याध्यापिका मीनाक्षी हिराजी पाटील या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शाळा, ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, सरपंच महेश पाटील, माजी उपसरपंच सदानंद मोरे, केंद्रप्रमुख जयंत पाटील, हेमंत म्हात्रे, माजी केंद्रप्रमुख मनोहर म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रिती घरत, तसेच विविध शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन केदारे यांनी केले. आपल्या मनोगतात मीनाक्षी पाटील यांनी 36 वर्ष 10 महिन्यांच्या सेवाकाळातील अनुभव सांगितले. पेण तालुक्यातील देवमाळ, पाबळ, निगडे, कोप्रोली, वाशी तसेच वावोशी केंद्रातील शिरवली येथे त्यांनी कार्य केले. गेल्या 15 वर्षांत शिरवली गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महिला मंडळ, तरुण मंडळ, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच उत्तम कार्य करता आले, असे त्यांनी सांगितले. आपल्या सेवाकाळातील आठवणी सांगताना त्या भावूक झाल्या. सरपंच महेश पाटील यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत, “मीनाक्षी पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तावाढीसाठी आणि शाळेचे नाव उंचावण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे शिरवली शाळेचे नाव तालुक्यात उज्ज्वल झाले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी निश्चितच जाणवेल,” असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मीनाक्षी पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वावोशी केंद्रातील शिक्षकवर्ग, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.







