। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईमध्ये होळीच्या दिवशी पाम बीच रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कारचालकाचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी नवी मुंबईत पाम बीच रोडवर दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पाम बीच रोडवर ही घटना घडली. तरुण आणि तरुणी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पाम बीच रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तरुण आणि तरुणी रस्त्यावर खाली पडले. तरुण रस्त्याच्या मधोमध पडला. याचवेळी पाठीमागून आलेल्या कारच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघातानंतर दोन्ही कारचे चालक घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलीस या दोन्ही कार चालकांचा शोध घेत आहेत.





