गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। गुहागर । प्रतिनिधी ।
गुहागर तालुक्यातील गिमवी गावा शेजारील एका गावातील सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनेने याबाबत गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
गेले अनेक दिवसांपासून सासऱ्याचे गैर प्रकार सुरू होते. यावर कुटुंबात बैठक होऊन सासऱ्याचा माफीनामाही झाला. मात्र, आपल्या सवयीतून न सुटलेल्या या सासऱ्याने आपल्या सुनेवरची वक्रदृष्टी कायम ठेवली. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या या सासऱ्याची वाईट सवय जात नव्हती. जाता-येता आपल्या सुनेला कोपर लावणे, तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या सुनेने अखेरीस गुहागर पोलीस ठाण्यामध्ये आपल्या सासऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी त्याचा मुलगा हा मुंबईमध्ये नोकरीच्या शोधानिमित्त गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.