डॉ. रुपाली सातपुते यांनी पदभार स्विकारला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे होती. दिर्घ प्रतिक्षेनंतर रायगड जिल्हा परिषदेला पुर्णवेळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी मिळाले आहेत. पालघरच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांच्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपविण्यात आली असून, बुधवारी(दि. 22) त्यांनी सुत्रे हाती घेतली.
रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांची पुणे येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. मात्र, त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आली नव्हती. हे पद अनेक महिने रिक्त होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. ग्रामीण विकास विभागाचे काम करीत असताना हंगामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम पहात होत्या. रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पालघरमधील ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रुपाली सातपुते यांनी यापूर्वी पालघर जिल्ह्यातील कुपोषण नियंत्रण, तसेच विकसित भारत संकल्प यात्रा यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. पालघर येथे आयोजित कोकण सरस महोत्सवासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. आता त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी (दि.22) रायगड जिल्हा परिषद येथे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे यांनी त्यांचे स्वागत केले.






