डॉ. उदय जोशी यांचे प्रतिपादन
| रायगड | खास प्रतिनिधी |
आर्थिक क्षेत्र निसरडे असते. तेव्हा संस्थेच्या वाटचालीत ध्येय धोरणे निश्चित असावीत. पतसंस्थांच्या दृष्टीने ग्राहकांच्या ठेवी हे एक प्रकारचे कर्ज आहे. पतसंस्थांकडे बँकांनी नाकारलेले कर्ज प्रस्ताव येत असतात. त्यामुळे कर्ज प्रक्रियेत कागदपत्रांची काटेकोरपणे छाननीसह ग्राहकांची वर्तणूक लक्षात घेतली पाहिजे. तसेच स्वतःचा पैसा ज्या पद्धतीने खर्च केला जातो त्या पद्धतीने संस्थेच्या कारभारात आर्थिक शिस्त पाळली पाहिजे असे महत्व पूर्ण प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी केले.
रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ आणि सहकार भारती रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अलिबाग येथील सभागृहात जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या वसुली अधिकारी, कर्मचारी, व्यवस्थापक, संचालक, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. जोशी बोलत होते. भांडवल पर्याप्तता, सी.डी. रेशो तसेच ग्रॉस एनपीए आदी बाबी अत्यंत काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संस्थेच्या मूल्यवर्धित ग्राहक सेवेसाठी कर्मचारी वर्ग प्रशिक्षित असायलाच हवा. त्याच बरोबर संस्थेची बलस्थाने, कमकुवत बाबी, संधी तसेच आव्हाने आदी बाबींचा साकल्याने विचार केला पाहिजे तरच सहकार वाढेल
मंदार वर्तक, सीईओ
रायगड जिल्हा बँक
याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी अमित भगत, रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे .टी . पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर, जळगाव जनता बँकेचे माजी महाव्यवस्थापक नितीन वाणी, मच्छिंद्र मुरुडकर, सहकारी भारतीचे प्रदेश पदाधिकारी अभय माटे, दिलीप टिकले, विनायक रानडे, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, अमित ओझे, दिलीप पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात डिजीटल बँकिंग सर्व्हीसेस, पतसंस्था आर्थिक शिस्त, स्वयं नियंत्रण, सहकारी संस्था आणि आयकर कायदा, गुंतवणूक / निधी व्यवस्थापन, व्यवसाय वृद्धी, लेखापरिक्षण, कर्ज व्यवहार वितरण व कागदपत्रे, कलम 101 दाखला पश्चात कार्यवाही, सक्तीची कर्ज वसुली, सामोपचाराने कर्ज वसुली तसेच कलम 156 चे अधिकार या विषयांवर वक्त्यांची अभ्यास पूर्ण मत व्यक्त केले. तसेच विविध विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली. प्रास्ताविकात अॅड.जे.टी.पाटील यांनी महासंघाच्या वतीने दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याचा सर्व पतसंस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. समारोप प्रसंगी सचिव योगेश मगर यांनी प्रशिक्षण वर्गात रायगड जिल्ह्यातील 45 पतसंस्थांचे 175 प्रशिक्षणार्थी कार्यशाळेत पूणर्र् वेळ उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.