घरमालकाचे लाखोंचे नुकसान
| उरण | वार्ताहर |
जसखार गावात मनोज चंद्रकांत भोईर यांच्या राहत्या घराला आग लागण्याची घटना मंगळवारी ( दि.21) दुपारच्या सत्रात ठिक 12.40 वा. घडली आहे. घरात कोणीही नसल्याने घरातील महिला, मुले थोडक्यात बचावली आहेत. आगीची माहिती गावातील रहिवाशांकडून सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग ही शाँटशर्किटमुळे लागली असावी असे तपासात पुढे येत असले तरी घरातील पैसे, मौल्यवान वस्तू, दागिने, फ्रिज, टिव्ही सह इतर जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत.

जसखार गावातील रहिवासी मनोज चंद्रकांत भोईर हे मंगळवारी (दि.21) नेहमी प्रमाणे कामावर गेले होते. त्याची पत्नी ही बाजूला सुरू असलेल्या त्यांच्या नव्या घराच्या बांधकामा ठिकाणी आपल्या राहत्या घराचा दरवाजा बंद करून गेली होती. त्यावेळी दुपारच्या सत्रात त्या राहत असलेल्या घराला आग लागण्याची बातमी तसेच रहिवाशांचा आरडाओरड सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. रहिवाशांनी सावधगिरी बाळगून सदर घटनेची माहिती सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग ही शाँटशर्किट मुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, घरात कोणीही नसल्याने घरातील माणसे थोडक्यात बचावली आहेत.
या घटनेची माहिती उरण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संतोषसिंग डाबेराव, सरपंच काशिबाई ठाकूर, ग्रामविकास अधिकारी रुपंम गावंड, तलाठी ज्योती भालचिन यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले आहेत. घर मालक मनोज चंद्रकांत भोईर यांनी नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेली रोख रक्कम 50 हजार, घरातील इतर असणारे पैसे, मौल्यवान वस्तू दागिने फ्रिज, टिव्ही संच तसेच जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्याची माहिती दिली आहे.