| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
समुद्राला उधाण सुरू झाले असून सीझन असला तरी मुरूड, राजपुरी, एकदरा, बोर्लीच्या समुद्रात मच्चीमारांना बंपर मासळी मिळत नाही. छोटी पापलेट, टायनी कोलंबी आणि चैती कोलंबी काही प्रमाणात मिळत आहे तर स्वादिष्ट आणि प्रसिद्ध शेवंड मासळीचा सीझन डिसेंबरपासून सुरू होईल अशी माहिती राजपुरी येथील जेष्ठ मच्छिमार धनंजय गिदीआणि एकदरा येथील नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. सध्या कोलंबी मिळत आहे; मात्र बंपर असा काही प्रकार दिसत नाही.कोलंबीचे सोडे 1600/- ते 1800/- किलो दराने विकले जात आहेत.
श्री गिदी म्हणाले की मोठी साईझ असणार्या पापलेट मासळीला मुंबईत मागणी असून उत्तम भाव मिळतो. 200 ग्रॅम पेक्षा अधिक वजनाची पापलेटची विक्री जलद होत असते.सध्या छोटी पापलेटआणि कोलंबी स्थानिक मार्केटमध्ये विक्रीस नेली जात आहे. काही अन्य भागातून सुरमई सारखी मासळी काही प्रमाणात येत आहे. परंतु मासळीचा बंपर प्रकार मात्र दिसत नाही.रोहन निशनदार म्हणाले की, अलिबाग आदी बाहेर गावाहून सुरमई, बोंबील तर दिघी बंदरातून बांगडे मासे मुरूडकडे विक्रीस येत आहेत. समुद्रात काही ठिकाणी जेलिफिश मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु टायनी आणि चैती कोलंबी नौकांना मिळत असल्याचे मच्चीमारांनी सांगितले. मात्र बंपरचे प्रमाण अजिबात नाही असे रोहन निशानदार यांनी स्पष्ट केले.
कोलंबीचे ताजे आणि कातळावर सुकविलेले सोडे राजपुरी, एकदरा गावातून विक्रीस येत आहेत.असे ताजे सोडे चवीला खूप चविष्ट लागतात.पर्यटकांना असे सोडे खूप आवडतात. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर नाशिक भागातून आलेले पर्यटक ताजे सोडे घेण्यासाठी मासळी मार्केट मध्ये गर्दी करताना दिसून येतात. कोलंबी बिर्याणी, सोडे मसाला रस्सा, फ्राय सोडे, पोहे सोडे, सोडे भात, कुरकुरीत भाजूनदेखील सोडे मेजवानी केली जाते. उपलब्ध ओल्या मासळीचे दर गगनाला भिडल्याने सर्व सामान्य नागरिकांना घेणे परवडत नाही. पर्यटकांनादेखील धक्का बसतोय.त्यामुळे सुक्या मासळी घेण्यासाठी अनेकजण वळत आहेत. 9 नोव्हेंबर पर्यंत शालेय सुट्टी असल्याने या आठवड्यात देखील पर्यटकांची वर्दळ कायम राहील असे दिसून येत आहे. मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, काशीद, नांदगाव, परिसरातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत; मात्र ताजी ओली मासळीचे प्रमाण कमी असल्याने मासळी साठी येणार्या खवय्यांचा हिरमोड होताना दिसतोय.