। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरमधील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवार येथे पाण्याने भरलेल्या जुन्या खाणीतील खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील चार जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे हे मृत्यू सामूहिक आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नागपूरमधील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारमध्ये खाणीच्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काही लोकांना खाणीच्या बाहेर पाच लोकांच्या चपला दिसल्या. यानंतर पाण्यामध्ये शोध घेतल्यानंतर पाच जणांचे मृतदेह आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाच्या मदतीने पाण्यातून मृतदेह काढण्यात आले. या घटनेत मृत्यू झालेल्या पाच जणांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे.
या पाच लोकांचा खाणीतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. असे असले तरी या पाच जणांच्या मृत्यूमागे घातपात आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.