| मुरुड | संतोष रांजणकर |
प्रसिद्ध मुरुड खोरा बंदरात आज सकाळी टोपी विक्रेत्याच्या स्टॉलवर भलेमोठे दगड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळला आहे. याकडे बंदर खात्याने लक्ष देऊन या परिसरातील डोंगराला सुरक्षा जाळी बसविण्याची गरज आहे. अशी मागणी पर्यटक व स्थानिकाकडून होत आहे. जगप्रसिद्ध मुरुड जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटक मुरुड खोरा बंदरात येत असतात. सध्या दिवाळी सुट्टीपासून मुरुडकडे पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाकाळात लाॅकडाऊन मुळे मुरुड मधील पर्यटन व्यवसाय बंद होते. हे व्यवसाय दीड वर्षानंतर सुरू झाले. लाॅकडाऊन पासून घरात बसून राहिलेल्या पर्यटकांनी पुन्हा पर्यटन क्षेत्र सुरू होताच पर्यटनाला मोठ्या प्रमाणात सुरावात केली आहे . खोरा बंदरात पर्यटन व्यवसाय करणारे तसेच येणारे पर्यटक व त्यांची वाहने यांच्या सुरक्षेततेसाठी या बंदरातील डोंगराला दरड सुरक्षा जाळी बसविण्याची गरज आहे. या पावसाळ्यात व वादळात खोरे बंदरात दरड कोसळली होती. व सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या डोंगराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन डोंगरावरील मोठमोठे दगड सैल झाले आहेत. त्यामुळे आज झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती न होण्यासाठी बंदर खात्याने दरड सुरक्षा जाळी बसवावी अशी मागणी पर्यटक व स्थानिकाकडून होत आहे.