| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मालाडच्या दिंडोशीमध्ये ही घटना घडली आहे. एसआरए इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालाड पूर्वेच्या दिंडोशीतील गोविंदनगर येथील एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक 14 व्या मजल्यावरून स्लॅब कोसळला. स्लॅबसोबत सात कामगार खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर झोपडीधारक आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना घेराव घातला. झोपडीधारकांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.