| पनवेल | वार्ताहर |
पनवेलहून – मुंबईच्या दिशेने जाणार्या कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणार्या कार एकमेकांवर धडकल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. सायन-पनवेल मार्गावरील कामोठे येथील उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
या अपघातातील टी परमिट वॅगनार कार मुंबईच्या दिशेने जात होती. ही कार कामोठे उड्डाणपुलावर आली असताना, चालकाने अचानक ब्रेक दाबून कार थांबवली. त्यामुळे त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणारी होंडा सिटी कार त्याच्यावर धडकली. त्यानंतर त्या कारवर त्याच्या पाठीमागून येणारी इतर दोन गाड्या एकमेकांवर धडकल्या. या चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे चारही वाहने रस्त्यात अडकून पडल्याने सायन-पनवेल मार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच कळंबोली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रथम अपघातग्रस्त वाहने बाजुला काढून वाहतुक सुरळीत केली.