उरणमधील नागरिकांची फसवणूक
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील पिरकोन गावातील सतीश गावंड याने पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप येथील नागरिकांचा असून, या फसवणुकीबाबत सतीश गावंडला अटकसुद्धा करण्यात आली होती. आता हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, एका-एका व्यक्तीने 50 दिवसात पैसे दुप्पट होईल या आमिषाने लाखो, करोडो रुपये गुंतविले आहेत. काही लोकांनी आपली शेती, घरे, दागिने गहाण ठेवून त्याचे पैशात (चलनी नोटात) रूपांतर करून हे पैसे पिरकोनमधील एजंटकडे दिले आहेत. एजंटमार्फत हे पैसे सतीश गावंड याच्याकडे पोहोचायचे व 50 दिवसांनंतर त्या व्यक्तीला दुप्पट पैसे मिळायचे. सुरुवातीला अंदाजे दोन वर्षे हा व्यवहार चालला. लोकांना डबल पैसे मिळाले. मात्र, नंतर सतीश गावंड यांना अटक झाल्यावर ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतविले होते, त्यांना मात्र व्याज मिळाले नाही. नंतर लोकांनी व्याज नको मुद्दल तरी द्या, अशी मागणी एजंटकडे केली. मात्र, आमच्याकडे पैसे नाहीत असे सांगून एजंटनी हात वर केले.
सतीश गावंड सुद्धा लोकांना भेटत नाहीत आणि एजंटसुद्धा कोणाला भेटत नाहीत. सतीश गावंड व त्याच्या एजंट लोकांचे फोन बंद असल्यामुळे गुंतवणूकदार गोंधळले आहेत. आता पैसा मागायचे कोणाकडे, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. व्याजही नाही आणि मुद्दलही नाही अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे. अगोदरच शेती, घर, बंगला, सोने लोकांनी बँकेत तसेच खासगी उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडे गहाण ठेवले आहे. त्यामुळे आपल्याजवळ होते ते सर्व नागरिक गमावून बसले आहेत. संतापलेले सर्व नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश गावंड व एजंट लोकांना जबाबदार धरत सतीश गावंड व एजंटच्या घरावर मोर्चा काढायचे निश्चित केले आहे व सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांकडून सर्वांना एकत्र येण्याचे आवाहनसुद्धा केले जात आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी एकत्र या व एजंटला जाब विचारा, असा मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या अनुषंगाने उरण पोलीस ठाण्यामार्फत कोणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयची नोटीसदेखील काढण्यात आली आहे.
एका व्यक्तीने पिरकोन गावातील व्यक्तीविरूध्द उरण पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पिरकोन गावातील व्यक्तीकडे एजंट लोकांमार्फत ठेविदाराने गुंतवणूक केले आहे व सदर व्यक्तीने एजंट यांच्याकडे पैसे ठेवले असून, एजंट लोक गुंतवणुकदार यांना पैसे परत न देता, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबाबत पिरकोन येथील आरोपी व्यक्तीने एजंटकडून 14 जूनला एजंटकडून पैसे घेणेबाबत सांगून पुन्हा 10 जुलै तारीख गुंतवणूकदारांना दिली आहे. जर 10 जुलैला पैसे न मिळाल्यास 16 जुलै रोजी मोठया संख्येने कोप्रोली नाक्यावर गुंतवणूकदारांनी उपस्थित राहून पिरकोन गावातील सर्व एजेंट यांचे राहते घरी जाऊन पैसे वसूल करण्याबाबत मॅसेजमध्ये नमूद केले आहे.
गुंतवणुकदारांनी एजंट लोकांनी पैसे परत दिले नाही म्हणून कायदा हातात न घेता उरण पोलीस स्टेशनला येवून संबंधीतांविरूध्द तकार दाखल करून न्यायीक व सनदशीर मार्गाचा अवलंब करावा. ज्या लोकांनी गुंतवणुक केली आहे, त्यांचे अगोदरच नुकसान झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीताविरूध्द गुन्हे दाखल होवू शकतात. त्यामुळे अडचणी मध्ये वाढ होणार आहे. गैर कायदयाची मंडळी जमवू नये अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
सतीश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण