| पनवेल | प्रतिनिधी |
सरकारी नोकरीला लावतो असे सांगून आठ लाख 71 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप सुरेश गायकवाड आणि गुलाब झा यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रथमेश दहिगावकर हे चेंबूर, मुंबई येथे राहत असून त्यांच्या मित्राने संदीप सुरेश गायकवाड (रा. खांदा कॉलनी) हे पैसे घेऊन सरकारी नोकरीला लावतात असे सांगितले. यावेळी गायकवाड यांनी मंत्रालय, बोर्ड सिक्युरिटी, बीएमसी व पोलीसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असून बऱ्याच जणांना नोकरीला लावल्याचे सांगितले. त्यावेळी दहिगावकर यांना त्यांचा भाऊ व त्यांचे असे मिळून नऊ लाख रुपये द्यावे लागतील, असे सागिंतले. त्यानंतर दोघांना नोकरी लावण्यासाठी मंत्रालयामध्ये नोकरीस असणारे अधिकारी गुलाब झा यांना खारघर येथे एका हॉटेलमध्ये भेट घालून दिली तसेच नोकरी न लागल्यास सहा महिन्यांच्या आत पैसे परत करतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांना 8 लाख 71 हजार रुपये देण्यात आले आणि सरकारी खात्याचे भरतीचे फॉर्म भरत राहिले. त्यानंतर पोलीस भरतीचे काम करून देतो, असे सांगण्यात आले. मात्र, त्या दोघांचे कोठेच सरकारी नोकरीत काम झाले नाही. विचारणा केली असता काम लवकर करतो असे सांगितले. पैसे परत करण्याबाबत सांगितले असता गुलाब झा जेलमध्ये असून, ते बाहेर आल्यानंतर पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, पैसे परत केले नाहीत. त्यामुळे संदीप गायकवाड आणि गुलाब झा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.