| उरण | प्रतिनिधी |
गेल्या पाच वर्षांत आमदारांनी तालुक्यात काडीचेही काम केलेले नाही. परंतु, आता केंद्र सरकारच्या मोठमोठ्या प्रकल्पाची कामे आपणच केल्याचे सांगत आहेत. आपण न केलेल्या कामाचे श्रेय घ्यायची पण यांना लाज वाटत नाही, असा घणाघात विद्यमान आ. महेश बालदी यांच्यावर उरण मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी केला. या भागातील सिडकोचा प्रश्न गंभीर आहे, तो सोडविण्याची ताकद फक्त शेकापमध्येच आहे. मध्यस्थी करून दलाली लाटणार्यांना आता घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन म्हात्रे यांनी केले.
शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी उरण तालुक्यातील गावाचा दौरा करून तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी वेश्वी दादरपाडा येथे कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी उरण तालुक्यातील शेकापचे प्रमुख नेते महादेव बंडा, फुंडे गावचे सरपंच बिल्लाशेठ, युवानेते रमाकांत म्हात्रे, मयूर भोईर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रीतम म्हात्रे म्हणाले की, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. तरूण शिकला आहे, परंतु केवळ नोकरीअभावी तो मागे पडत आहे. या तरूणांना नोकरी मिळावी यासाठी आपण मोफत प्रशिक्षण सुरू केले असून, त्यातून 44 तरूणांना विमानतळावर नोकरी मिळवून देण्यात यशस्वी झालो आहे. उद्याच्या भविष्यात अशाच पध्दतीने काम करून हजारो-लाखो तरूणांना नोकर्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रीतम म्हात्रे म्हणाले. येथील आमदारानी तालुक्यात काहीच काम केले नसल्याने तो आता केंद्र सरकारचे मोठमोठे प्रकल्पाची कामे आपणच केल्याचे सांगत आहे. मध्यस्थी करून दलाली लाटणार्यांना आता घरचा रस्ता दाखवून आपण आपल्यातल्या माणसाला संधी देणे काळाची गरज बनली आहे. येत्या 20 तारखेला शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबून आपण आपल्या विकासाचा महामार्ग प्रशस्त करायचा आहे आणि मला निवडून द्या, असे आवाहन प्रीतम म्हात्रे यांनी केले.