| मुंबई | प्रतिनिधी |
अंधेरीमध्ये मित्राने मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवी दिल्याचा राग आल्यामुळे तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील कोल डोंगरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. कोल डोंगरी सहार रोडवरील यशोधन सोसायटीच्या मोकळ्या जागेत सुजित सिंग (39) आणि सुनील कोकाटे (52) हे गप्पा मारत बसले होते. गप्पा मारताना सुजितने सुनीलला शिवी दिली. शिवीगाळ केल्यामुळे सुनील कोकाटेला राग आल्याने. त्याने सुजितला मारहाण करत त्याच्यावर चाकूहल्ला केला. सुनीलने चाकूच्या सहाय्याने सुजितच्या छातीवर आणि हातावर वार केले. या हल्ल्यामध्ये सुजित गंभीर जखमी झाला. रक्तस्राव अधिक प्रमाणात झाल्यामुळे सुजितचा जागेवरच मृत्यू झाला. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मयत सुजितच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिस ठाण्यात सुनीलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.