राहुरी पोलिसांची कामगिरी
। बीड । प्रतिनिधी ।
राहुरी येथील एका कार्यक्रमात महिला चोरट्यांनी धुमाकूळ घातला. याप्रकरणी एका महिला भक्ताने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असता त्याचा तपास करताना राहुरी पोलिसांनी बीड येथे जाऊन महिला चोरांच्या चार जणींच्या टोळीला ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी राहुरी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुरी येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरांची टोळी सक्रिय झाली. यावेळी सुनेच्या अंगावरील सोन्याचे दागिने महिलांनी जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केल्याचा गुन्हा एका महिला भक्ताने नोंदविला. राहुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या तसेच, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. पोलीस पथकाने बीड येथे जाऊन अवघ्या 24 तासांच्या आत शनिवारी आरोपींना ताब्यात घेतले. केशर जाधव (वय 50, रा. गांधीनगर, बीड), गवळण गायकवाड (वय 40, रा. माऊलीनगर, बीड), पूजा वाघमारे (वय 25, रा. खोकरमोह, ता. शिरूर जि. बीड), पूजा मोहिते (वय 27, रा. नेवासा फाटा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही महिला आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.