पाच जिल्ह्यातील कुस्तीपटूंचा सहभाग
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कडाव येथे लाल मातीवरील कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात रायगडसह ठाणे, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील कुस्तीगीर सहभागी झाले होते. दरम्यान, कडावच्या अखाड्यात कुस्तीची अंतिम लढत अटीतटीची झाली. त्यात ठाण्याच्या भावेश साळवी आणि नाशिच्या धर्मा शिंदे यांची कुस्ती बरोबरीत सुटली. दरवर्षी कडाव येथे माघी गणेश जन्मोत्सवादिवशी या स्पर्धा पार पडत असतात. यंदाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती अशोक भोपतराव यांच्याकडून कुस्तीचा आखाडा भरवण्यात आला होता. कडाव येथे कर्जत कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने लाल माती मधील कुस्तीचा आखाडा रंगविण्यात आला होता.
1995 पासून सुरू असलेल्या या कुस्ती आखाड्यात यंदाही रायगड, ठाणे, पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील नामांकित पैलवान सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पुरुषांसोबत महिलाही या कुस्ती स्पर्धेत उतरल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भगवान धुळे आणि पंच दीपक भुसारी, रमेश लोभी, वासुदेव भगत, तुळशीराम धुळे, हरिश्चंद्र धुळे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. राज्यस्तरावर खेळत असलेली समृद्धी लोभी देखील या आखाड्यात उतरली होती. त्यावेळी तिचा खेळ पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती. तर, तालुक्यातील कुस्तीपटू विजय धुळे, रोशन धुळे, प्रवीण धुळे, सूरज जोशी या राज्यस्तरीय पैलवानांनी या स्पर्धेत आपली छाप कायम ठेवली.
या कुस्ती स्पर्धेत पैलवानांना 500 रुपयांपासून 21 हजार रुपयांपर्यंतचे बक्षिसे देण्यात आले. या माध्यमातून नव्या पिढीतील कुस्तीपटूंना अनुभव आणि व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेतील अंतिम सामना शेवटपर्यंत रंगला होता. चुरशीच्या लढतीत ठाण्याच्या भावेश साळवी आणि नाशिकच्या धर्मा शिंदे बरोबरीत सुटला. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना चांदीच्या गदासह 11 हजार रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
कर्जत कुस्तीगीर संघटनेचा पुढाकार
कुस्ती हा भारताचा पारंपरिक खेळ असून त्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. शाळा-महाविद्यालयांतून कुस्तीचा प्रचार, नियमित सरावाची व्यवस्था, सामाजिक जागरूकता आणि सरकार-खासगी संस्थांचा सहभागामुळे कुस्तीला नवी संजीवनी मिळू शकते. अशा प्रकारे प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात नव्या दमाचे पैलवान घडतील आणि कुस्ती पटू निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच कर्जतच्या कुस्तीगीर संघटनेने पुढाकार घेत दरवर्षी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करत असतात.