डेंग्यूसह साथीच्या आजारांचा फैलाव
ठेकेदाराचा हलगर्जीपणा; नागरिकांच्या जीवाशी खेळ
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा बेजबाबदार कारभार आणि कचरा ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे उरण शहरासह बोरी परिसरात अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये, नाल्यांमध्ये आणि वस्ती परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधीने वेढला आहे. त्यामुळे डास, माशा आणि घातक जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप होत आहे.
उरण नगरपरिषद दरवर्षी कचरा संकलनासाठी लाखो रुपयांचा ठेका देते. परंतु, प्रत्यक्षात मात्र बोरीसह उरण शहरातील अनेक भागांत नियमित कचरा उचलला जात नसल्याने परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यातून असह्य दुर्गंधी पसरत असून नाले तुंबणे, सांडपाणी साचणे आणि डासांची पैदास होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शहरातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, अस्वच्छता आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उरणमध्ये डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांचा फैलाव वाढत आहे. अनेक नागरिक ताप, डेंग्यूसदृश लक्षणे आणि संसर्गजन्य आजारांनी त्रस्त असूनही नगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही आरोग्य विभाग आणि कचरा ठेकेदाराकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कचरा उचलण्याचे वेळापत्रक पाळले जाते का, ठेकेदार करारातील अटींचे पालन करतो का, याची तपासणी होत नसल्याने संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र, प्रत्यक्षात कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत आहेत. स्वच्छतेच्या घोषणा देणारे अधिकारी प्रत्यक्षात शहरातील कचऱ्याच्या साम्राज्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे आरोग्य निरीक्षकच आजारी पडल्याचे समजते. उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कचरा संकलनासाठी झालेल्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, कचरा ठेकेदाराच्या कामाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कठोर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. करदात्यांच्या पैशातून स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च होत असताना शहर कचऱ्याच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे ‘स्वच्छ उरण’ ही घोषणा केवळ फलकांवरच राहिली असून प्रत्यक्षात नागरिकांना कचरा, दुर्गंधी आणि साथीच्या आजारांच्या छायेत जगावे लागत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया उरणकरांमधून व्यक्त होत आहे.





