गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला
| पोलादपूर | प्रतिनिधी।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासमोर गुरुवारी (दि.23) सायंकाळी अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने कलंडला. या अपघातात टँकरमधून कोणतीही गॅसगळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा टँकर मुंबईकडून गोव्याच्या मार्गिकेवरून जात होता. कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासमोर आल्यानंतर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला. धोकादायक अमोनिया गॅस टँकरमध्ये असल्याने काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, टँकरच्या तपासणीअंती गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची पाहणी केली तसेच वाहतुकीचे नियोजन केले. या अपघातात टँकर चालक प्रेमप्रकाश भस्कळ पटेल (42) रा. कमळानगर, जास्मिन रोड, बृहन्मुंबई याला किरकोळ दुखापत झाली. त्याला तातडीने कलंबोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे जात असल्याने कंपनीचे सेफ्टी अधिकारी व प्रतिनिधीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरची सखोल तपासणी करून कोणत्याही प्रकारची अमोनिया गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागरिकांना किंवा परिसराला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशिरा अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला करण्यात आला आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. या अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.







