| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील मंगळवारी 11 व्या दिवसाचे खेळ खेळले जात आहेत. आता मंगळवारी भारताचे सर्वात मोठे आशास्थान असलेला नीरज चोप्रा मैदानात उतरला आहे.
मंगळवारी पुरुषांच्या भालाफेकीची पात्रता फेरी खेळवण्यात आली. या पात्रता फेरीतमध्ये भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा समावेश ‘ब’ ग्रुपमध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्यानेच सर्वात पहिल्यांदा भाला फेकला. यावेळी त्याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 89.34 मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. विशेष म्हणजे याआधी झालेल्या ‘अ’ ग्रुपमधील पात्रता फेरीतमधील 16 खेळाडूंपेक्षाही नीरजचे अंतर सर्वोत्तम ठरले आहे. ‘अ’ ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर राहिला होता. त्याने 87.76 मीटर भाला फेकला होता. दरम्यान, ‘अ’ ग्रुपमध्ये भारताचा किशोर जेना होता. मात्र तो या ग्रुपमध्ये 9 व्या क्रमांकावर राहिला. त्याने सर्वोत्तम 80.73 मीटर भाला फेकला. त्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपले. त्यानेही ही भालाफेक पहिल्या प्रयत्नात केली होती. दुसऱ्या प्रयत्न त्याचा अपयशी ठरला.