। पनवेल । वार्ताहर ।
नांदगाव येथील पुलावर खड्ड्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रेलर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी (दि. 04) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आदेश लाड (24) हा आपल्या मोटारसायकलवरून त्याची मैत्रीण मानसी रोकडे (24) हिला घेऊन जेएनपीटी रोडने मुंबई बाजूकडे जात होता. दरम्यान, नांदगावच्या समोरील पुलावर आले असता मोठ्या खड्ड्यात त्यांची मोटरसायकल आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेली मैत्रीण मानसी रोकडे मोटरसायकलवरून खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रेलर क्रमांक एम एच 43 यु 1673 या ट्रेलरचे चाक मानसीच्या अंगावरून गेले. यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.